लंडन – युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबताना दिसत नाही. अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देश युक्रेनला सातत्याने लष्करी मदत पाठवत आहेत. आता रशियाने अमेरिकेला युक्रेनला लष्करी मदत न पाठवण्याचा इशारा दिला आहे. वॉशिंग्टनमधील रशियाचे राजदूत अनातोली अँटोनोव्ह यांनी म्हटले आहे की, आम्ही अमेरिकेला युक्रेनला शस्त्रास्त्रांची खेप पाठवू नये, असे सांगत आहोत. असे करणे अस्वीकार्य आहे. रशियाकडून वॉशिंग्टनला डिप्लोमॅटिक नोट पाठवण्यात आल्याचे अँटोनोव्ह यांनी सांगितले आहे.
युक्रेनला लष्करी मदत पाठवल्याने रशियाचा संताप; अमेरिकेला दिला हा इशारा
अनातोली अँटोनोव्ह पुढे म्हणाले की, अमेरिकेकडून युक्रेनला अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याने संघर्ष आणखी वाढेल. दरम्यान, रविवारी उशिरा अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड अॅस्टिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची कीव्ह येथे भेट घेतली. या बैठकीत रशियन आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेन आणि प्रदेशातील इतर देशांना $713 दशलक्ष आर्थिक मदत देण्याचे वचन दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सातत्याने अमेरिका आणि मैत्रीपूर्ण युरोपीय देशांना लष्करी मदत देण्याचे आवाहन करत आहेत.
एएनआयच्या वृत्तानुसार, अमेरिकन प्रशासनाने वॉशिंग्टनमधील रशियन दूतावासाच्या कामकाजावर अघोषित बंदी घातली आहे. अमेरिकेतील रशियाचे राजदूत अनातोली अँटोनोव्ह यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, रशियन दूतावासाला अमेरिकन सरकारी संस्थांच्या कामकाजात अडथळा आणला जात आहे. याचाच एक भाग म्हणून, बँक ऑफ अमेरिकाने ह्यूस्टन आणि न्यूयॉर्कमधील आमच्या वाणिज्य दूतावासांची बँक खाती एकतर्फी बंद केली आहेत. फोन आणि मेलद्वारे धमक्या दिल्या जात आहेत.
युक्रेनवर रशियाच्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर सर्व प्रकारचे निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग म्हणाले की, निर्बंध उठवण्याबाबत अमेरिका सध्या रशियाशी चर्चा करणार नाही. रशियावरील निर्बंध शिथिल करण्याच्या कोणत्याही प्रस्तावावरही विचार केला जात नाही.