जिग्नेश मेवाणी यांना आसाम कोर्टाने जामीन दिल्यानंतर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी केली पुन्हा अटक


गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी आसाममधून अटक करण्यात आलेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसामच्या कोक्राझार न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण, जामीन मिळाल्यानंतर ‘अधिकाऱ्यांवर हल्ला’ केल्याच्या आरोपावरून आसाम पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, काँग्रेस समर्थित आमदार मेवाणी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच कोक्राझार कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. काँग्रेस आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक केली. तेथून त्यांना आसामला नेण्यात आले.

उल्लेखनीय आहे की, आसाम पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मेवाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेवानी यांना रस्तेमार्गे अहमदाबादला नेण्यात आले, तेथून त्यांना रेल्वेने आसाममधील गुवाहाटी आणि नंतर रस्त्याने कोक्राझार येथे आणण्यात आले. ते वडगामचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दावा केला होता की, गोडसे यांना देव मानणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षाविरोधात शांतता आणि सलोख्याचे आवाहन करावे.

वरील ट्विटच्या संदर्भात, मेवाणी यांच्याविरुद्ध IPC कलम 120B (गुन्हेगारी कट), 153 (A) (दोन समुदायांविरुद्ध शत्रुत्व वाढवणे), 295 (A) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने बोलणे) ट्विट आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.