आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार अक्षय कुमार


अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. अक्षयने त्याच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री राधिका मदन दिसणार आहे. साऊथ स्टार सुर्याच्या सुपरहिट चित्रपट सूरराई पोत्रूचा हा हिंदी रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

राधिका आणि अक्षयने चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राधिका, अक्षय आणि दिग्दर्शक सुधा कोंगरा बसले आहेत. राधिकाच्या हातात एक नारळ आहे, जो ती लाल कपड्यावर फोडते. हे बघून अक्षय आणि सुधा खुश झाले. अक्षय कुमारच्या हातात क्लेप बोर्डही आहे.

व्हिडिओ शेअर करत अक्षयने लिहिले की, नारळ फोडून प्रार्थना केल्यानंतर आम्ही आमच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अद्याप त्याचे नाव ठरवण्यात आलेले नाही. तुम्हाला काही नाव सुचत असेल, तर नक्की सांगा आणि हो शुभेच्छा पण द्या.

अक्षय कुमारच्या या प्रोजेक्टची घोषणा करण्यापूर्वी चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने ही माहिती दिली होती. पीपिंग मूनशी संवाद साधताना सूत्राने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून अक्षय या चित्रपटाची चर्चा करत आहे. त्याने तोंडी हो म्हटले, पण करारावर स्वाक्षरी होणे बाकी आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच हिंदी चित्रपटाची पटकथाही जबरदस्त लिहिली गेली आहे. अक्षयला ही कथा आवडली आहे. त्यांनी कथा उत्तर भारतीय सेटिंगनुसार ठेवली आहे, परंतु तिच्या भावना आणि प्रेरणांशी तडजोड केली नाही.

अक्षयच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा बच्चन पांडे या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि संजय मिश्रा होते. याशिवाय त्याच्याकडे राम सेतू, रक्षाबंधन, पृथ्वीराज, मिशन सिंड्रेला, ओएमजी २ आणि सेल्फी असे चित्रपट आहेत.