भारतात सध्या बुलडोझर फारच चर्चेत आहेत. ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जोन्सन बुलडोझरवर आरूढ झाल्याचे फोटो नुकतेच झळकले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘बुलडोझर बाबा’ म्हणून प्रसिद्धीस आले आहेत आणि जहांगीरपूर मधील बुलडोझर कारवाई अजून हॉट टॉपिक आहे. अवैध बांधकामांवर हातोडा म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर चलनात असलेले हे बुलडोझर प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि त्याची अवघड कामे सुलभ व्हावी या उद्देशाने बनविले गेले होते याची माहिती फार थोड्यांना असेल.

ओबडधोबड, खडकाळ जमीन सपाट करून ती लागवडी योग्य बनविणे शेतकऱ्यांना सहज व्हावे यासाठी सर्वप्रथम बनविला गेला तो ट्रॅक्टर आणि त्याचेच आधुनिक रूप बुलडोझर. जगात ट्रॅक्टर बनविणाऱ्या होल्ट कंपनीने पहिला बुलडोझर बनविला. १८ डिसेंबर १९२३ रोजी म्हणजे सुमारे ९९ वर्षापूर्वी शेतकरी जेम्स कुनिन्ग्स व ड्राफ्ट्समन जे अर्ल मेक्लेमोड यांनी अमेरिकेत कॅन्सस येथे खडकाळ शेतजमीन सपाट करण्यासाठी बुलडोझर बनविला असे इतिहास सांगतो. त्यामुळे जमीन सपाट आणि भूश्भुशीत बनविणे फारच सोपे झाले. या डिझाईनचे पेटंट घेतले गेले ते मात्र ट्रॅक्टरची शेतीकामासाठीची एक अॅटॅचमेंट म्हणून.

हे वाहन दिसायचे ट्रॅक्टर सारखेच पण त्याच्या पुढच्या भागात लांब, पातळ धातूची प्लेट लावली गेली होती जी मेकॅनिझमच्या सहाय्याने खाली घेऊन माती उकरून जमीन सपाट करत असे. याला ड्रायव्हर केबिन नव्हती.नंतर यात विविध ब्लेड जोडून त्याचा बुलडोझर बनला पण त्याला बुल ग्रेडर म्हटले जात होते. १९३० पर्यंत याचा वापर शेतीकामासाठी होत होता.

नंतर मात्र जोडली जात असलेली विविध ब्लेड सहज ऑपरेट व्हावी यासाठी ट्रॅक्टर ऐवजी मोठे दमदार वाहन बेस म्हणून हवे अशी निकड निर्माण झाली आणि त्यानंतर अनेक नामवंत कंपन्या बुलडोझर निर्मिती करू लागल्या. आताचे बुलडोझर जीपीएस सिस्टीम सह अत्यंत आधुनिक रुपात उपलब्ध आहेत. बर्फ हटविण्यासाठी सुद्धा ते वापरले जातात. कॅटरपिलर, कोमास्तु, लिव्हर, केज, जोन डी रे अश्या अनेक कंपन्या बुलडोझर बनवितात. त्यांच्या किमती १० लाखापासून ५० लाख पर्यंत आहेत. भारतात बहुतेक बुलडोझर आयात केले जातात. टाटा आणि अन्य काही कंपन्या विदेशी तंत्र वापरून भारतात बुलडोझर बनवीत आहेत.