रांगा विसरा, घरबसल्या सरकारी किमतीत घरपोच रेशन मिळवा
लवकरच देशात रेशन दुकानासमोर लागणाऱ्या रांगा हे अनेक वर्षांचे चित्र इतिहास जमा होणार असून रेशन दुकानावर रांगा लावण्याच्या कामातून आम जनतेला मुक्ती मिळणार आहे. केंद्र सरकारने उमंग अॅपवर रेशन सर्विस सुविधा सुरु केली असून घरबसल्या महिनाभराचे रेशन सरकारी किमतीत रेशन कार्ड धारकांना मागविता येणार आहे. देशाच्या २२ राज्यात ही सेवा सुरु झाली आहे.
या सुविधेत रेशन घरपोच मागविण्याबरोबर जवळचे रेशन दुकान शोधता येणार आहे. धान्याच्या किमती चेक करता येणार आहेत, दुकानातील सर्व उपलब्ध वस्तूंची यादी पाहता येणार आहे आणि सुलभतेने, योग्य पैसे खर्च करून रेशन घेता येणार आहे. इतकेच नव्हे तर रेशन कार्ड धारक त्यांची गेल्या सहा महिन्यातील रेशन खरेदी रेकॉर्ड पाहू शकणार आहे.
‘मेरा रेशन सर्व्हिस’ या नावाने हिंदी इंग्रजी बरोबरच भारतातील १२ भाषा यात वापरता येणार आहेत. तेलगु, तमिळ, मल्याळी, कन्नड, पंजाबी, ओरिया, बंगाली, उर्दू, गुजराथी, मराठी मध्ये उमंग हे भारत सरकारचे मोबाईल अॅप वापरता येईल. सर्व अँड्राईड प्ले स्टोर मध्ये ते सहज उपलब्ध आहे.
उमंग अॅपवर १२७ सरकारी विभागाच्या ८४१ हून अधिक सेवा सुविधा उपलब्ध केल्या गेल्या असून त्यात गॅस कनेक्शन पासून पेन्शन, ईपीएफओ अश्या अनेक सेवा अंतर्भूत आहेत.