तेजप्रताप यादव यांनी अमित शहाना दिले इफ्तार पार्टीचे निमंत्रण

बिहारचे माजी मंत्री आणि लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजप्रताप या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत असतात. सोशल मिडीयावर ते खूपच सक्रीय असून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना दिलेले एक निमंत्रण सध्या सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले आहे. यात तेजप्रताप यांनी गृहमंत्री अमित शहा यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रित केले असून ही पार्टी आज म्हणजे २२ एप्रिल रोजी सायंकाळी बिहारच्या माजी मुख्यमंत्री रबडी देवी यांच्या १० सर्क्युलर रोड या निवासस्थानी होत आहे. विशेष म्हणजे अमित शहा उद्या म्हणजे २३ एप्रिल रोजी बिहारला भेट देणार आहेत.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या तेजप्रताप यांच्या निमंत्रणपत्रिकेवर प्रेषक म्हणून रबडी देवी आणि तेजस्वी यादव यांचीही नावे आहेत. रबडी देवीच्या घरी सायंकाळी ६ वा.१७ मिनिटांपासून इफ्तार आयोजन सुरु होणार असून त्यात तेजस्वी आणि तेजप्रताप रोजंदारीवर काम करणाऱ्या मुस्लीम लोकांसह सामील होणार आहेत. या निमंत्रण पत्रिकेवर छापली गेलेली शायरी फार चर्चेत आली आहे. तेजप्रताप यांचे फेसबुक, ट्वीटर शिवाय स्वतःचा ब्लॉग असून त्यावरून ते त्यांचे समर्थक आणि चाहत्यांना बऱ्याच बातम्या देत असतात. ते रोज करत असलेली कामे, पूजा ते स्विमिंग पूल मधील पोहणे इथपर्यंत सर्व व्हीडीओ ते शेअर करतात.