गुरु तेग बहादूर यांचे ४०० वे प्रकाश पर्व: पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून करणार देशाला संबोधित


नवी दिल्ली: शीख धर्माचे 9 वे गुरू, गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, 21 एप्रिल रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी शीख गुरु तेग बहादूर यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील.

सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे संबोधन लाल किल्ल्याच्या तटबंदीऐवजी लॉनमधून रात्री 9.15 वाजता सुरू होईल. यादरम्यान अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर प्रमुख शीख नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी ४०० रागी (शीख वादक) शब्द कीर्तन करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या भाषणाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

1675 मध्ये मुघल शासक औरंगजेबने शिखांचे नववे गुरू गुरु तेग बहादूर यांना लाल किल्ल्यावर फाशी देण्याचा आदेश दिला होता. यामुळेच गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त लाल किल्ल्याची निवड करण्यात आली.

गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांचे हे भाषण डीडी न्यूजवर पाहता येईल. याशिवाय तुम्ही पीएमओ आणि भाजपच्या यूट्यूब चॅनेलवरही पंतप्रधानांचे हे संबोधन पाहू शकता. तसेच, या भाजप आणि पीएमओच्या फेसबुक आणि ट्विटर पृष्ठांना भेट देऊन ते पाहता येईल.

गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वावर पंतप्रधान मोदींच्या भाषणासाठी लाल किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर 1000 अतिरिक्त दिल्ली पोलिस तैनात करण्यात आले आहेत. लाल किल्ला संकुलात 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, कोणतीही चूक होऊ नये, यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.