जेम्स लेनने पुरंदरेंशी चर्चा झाली नसल्याचा खुलासा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया


मुंबई – जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरुन महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून मनसे आणि राष्ट्रवादीत यानिमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. वादग्रस्त पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरेंनीच जेम्स लेनला माहिती दिली, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तर शरद पवारांवर जातीचे राजकारण केल्याचा आरोप करत बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. त्यातच स्वत: लेख जेम्स लेनने या वादावर भाष्य केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आपल्या माहितीचे स्त्रोत नव्हते, असे सांगितले आहे.

बाबासाहेब पुरंदरेंशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचा जेम्स लेन यांनी दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. २० वर्ष हा कुंभकर्ण झोपला होता का? अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली असून हे कोण मॅनेज करत आहे, याची मला माहिती नसल्याचे सूचक वक्तव्यही केले आहे.

एक तर २००३ साली हा वाद सुरु झाला होता. तोपर्यंत २० वर्ष हा कुंभकर्ण झोपला होता का?, अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. हे वाक्य पुस्तकातून काढत का नाही, अशीही विचारणा त्यांनी केली आहे. आरोप करायचा, मग दुसऱ्या दिवशी पत्रक काढायचे, हे कोण मॅनेज करत आहे, याची मला माहिती नाही. जेम्स लेनची सुरुवात कोणी केली सर्वांना माहिती आहे, पण नाव घ्याचे नाही, असं यावेळी ते म्हणाले,

मला पत्रकारांचेही आश्चर्य वाटते. २० वर्षांनी त्यांना जेम्स लेन सापडला. जेव्हा महाराष्ट्र भूषण झाला तेव्हा वाद झाला, २००३ ला पुस्तक आले, तेव्हा जेम्स लेन नाही सापडला. या महाराष्ट्रात शोधपत्रकारिता करत असलेल्या काही मोठ्या पत्रकारांना आता जेम्स लेन सापडला. म्हणजे महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करण्याचा हा किती मोठा कट आहे, याचे उत्तम उदाहरण आहे. ज्या पत्रकाराने मुलाखत घेतली त्यांनी कोणत्या आधारे लिहिले हे विचारावे आणि हे काढत का नाही विचारावे. जे घाणेरडे लिहिले आहे ते काढू टाका असे सांगा, अशी मागणी आव्हाडांनी यावेळ केली.

पुरंदरे यांनीच स्वत: लिहिले असल्यामुळे हा संबंध येतो, असेही ते म्हणाले. इतिहासाचा मी देखील अभ्यासक आहे. २० वर्षांनी पत्रकार शोधतात, मग तो सापडतो, मुलाखत घेतो. आम्ही काय वेडे म्हणून जन्माला आलो आहोत का? याआधी जेम्स लेनला मातीत गाडले होते का?बाबासाहेबांच्यां मृत्यूनंतर तो बाहेर येतो, असे अनेक प्रश्न आव्हाडांनी विचारले आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत मस्ती करु नका, परिणाम गंभीर होतील, असा इशारा दिला होता, याची आठवण आव्हाडांनी यावेळी करुन दिली.