मुंबई : टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) या संस्थेत आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी त्यांचे पणतू सुजात आंबेडकर यांना सहभागी होण्यास संस्थेने मज्जाव केल्यामुळे कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. कार्यक्रमात संस्थेबाहेरील कुणालाही सहभागी होऊ देण्यास परवानगी नसल्याचे कारण संस्थेने दिले.
सुजात आंबेडकर यांना डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यास मज्जाव
१४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त, टीआयएसएस संस्थेच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुजात आंबेडकर यांना त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांनी निमंत्रित केले होते. कार्यक्रमाला येण्याची तयारी सुजात आंबेडकर यांनीही दाखवली होती. आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने याबाबत संस्थेला ८ एप्रिलला पत्र दिले होते. त्यात पाहुणे कोण याचेही तपशील देण्यात आले होते.
मुळात तीन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना संस्थेने परवानगी नाकारल्यामुळे एका दिवसाच्याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पण, कार्यक्रमासाठी परवानगी देताना संस्थेने बाहेरील कुणाही व्यक्तीला सहभागी होण्यास मज्जाव केला. त्या अटीनुसार सुजात आंबेडकर यांनाही या कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसल्यामुळे अखेरीस कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली.
अनेक कार्यक्रम संस्थेच्या परिसरात होतात. नुकतेच शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले, एका अहवालाचे प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमांना अनेक बाहेरील व्यक्तींनी हजेरी लावली होती. मैदानावर होळी खेळण्यासही संस्थेने परवानगी दिली होती, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. इतर सर्व कार्यक्रमांना बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत नाहीत, असे असताना सुजात आंबेडकर यांनाच परवानगी नाकारण्याचे काय कारण होते असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.