मुंबई – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी प्रशासनाकडून कारवाई होण्याआधीच विविध विभागांना पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट केली आहे. संजय राऊत यांचे आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले आहेत.
टॉयलेट घोटाळा प्रकरणी कारवाईआधीच सोमय्यांकडून बाजू सावरण्याचा प्रयत्न
नगर विकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना किरीट सोमय्या यांनी पत्र लिहिले आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला, असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीन देखील सरकारची असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले. मी माझी बाजू आपली स्पष्ट करत नसून यातील सत्यस्थिती सांगत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
एकूण 154 सार्वजनिक शौचालये मिरा भाईंदर शहरात बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साढे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
विधानसभेत हा मुद्दा आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरू केली आहे. 18 मार्च 2021 रोजी शासनाला महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता मेधा सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.