जबरदस्ती आरती करताना कसे काय वाटले अजित पवार साहेब ?; निलेश राणेंचा खोचक टोला


मुंबई – मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता विविध पक्षांकडून मनसेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शनिवारी पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाआरती केल्यानंतर सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम नागरिकांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी उपस्थित होते. प्रशांत जगताप यांनी यावेळी हनुमान चालीसा म्हटली, तर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली. यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांना टोला निलेश राणे यांनी ट्विट करत लगावला आहे. आज कधी नव्हे ते अजित पवारांना हनुमान जयंतीच्या निमित्ताने आरती करताना बघितलं, काय अजित पवार साहेब कसं वाटलं जबरदस्ती आरती करताना?? हनुमान जयंतीनिमित्त वातावरण ढवळून निघाल्याने ज्यांना मंदिरात जायची एलर्जी होती ते सुद्धा भगवे पट्टे घालून मंदिरात धडपडत होते, असे निलेश राणेंनी म्हटले आहे.