रशियन संरक्षणमंत्री सर्गेई यांचा हार्टअॅटॅक नैसर्गिक नाही

रशियाचे संरक्षण मंत्री आणि पुतीन यांचे जवळचे समजले जाणारे सर्गेई शोईगु यांना हार्टअॅटॅक आल्याची चर्चा माध्यमातून सुरु आहे आणि हा हार्टअॅटॅक नैसर्गिक नसून त्यांच्या हत्येचा हा कट असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. गेले दोन महिने रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. या मोहिमेत प्रथम सर्गेई आघाडीवर होते पण गेले काही आठवडे त्यांचे दर्शन झालेले नाही. त्या मागे हार्टअॅटॅक हेच कारण असून संशयावरून किमान २० रशियन लष्करी अधिकार्यांना ताब्यात घेतले गेल्याचे बोलले जात आहे.

युक्रेनवर चाललेले हल्ले संथ गतीने होत आहेत या कारणास्तव पुतीन सर्गेई यांच्यावर नाराज आहेत असे सांगितले जात आहे. या संदर्भात पुतीन आणि सर्गेई यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर काही दिवसात सर्गेई यांना हार्टअॅटॅक आला असे समजते. रशियन टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार रशियन व्यावसायिक लियोनिद नेवजलीन यांनी सर्गेई यांचा हार्टअॅटॅक नैसर्गिक नसल्याचा दावा केला असून हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

२०१२ पासून सर्गेई पुतीन यांच्या खास मर्जीतले मानले जातात. युक्रेनवरील हल्ल्यांपासून पुतीन एकटे पडले आहेत. सर्गेई यांच्या संशयास्पद हार्टअॅटॅक मुळे पुतीन आणि सैन्य अधिकारी यांच्यातील अनबन समोर आल्याचे लियोनिद यांचे म्हणणे आहे. लियोनिद हे रशियन धनकुबेर आहेत. पण २००३ मध्ये त्यांची तेल कंपनी पुतीन यांनी जप्त केल्यावर ते देश सोडून गेले आहेत. मार्च अखेर पुतीन आणि सर्गेई यांच्यात तणाव निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काल रिलीज झालेल्या एका व्हिडीओ मध्ये पुतीन अन्य काही मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये बोलताना दिसत आहेत त्यात सर्गेई दिसत आहेत मात्र ते काही बोलत नाहीत. हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा लियोनेल यांनी केला आहे.