म्हणून बजरंगबलीला प्रिय आहे शेंदूर

देशभर आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. देशभरातील मंदिरातून हनुमानाची पूजा अर्चा अभिषेक होत आहेत. हनुमान पूजे मध्ये शेंदुराला विशेष महत्व असून मारुतीला शेंदूर चढवला तर तो लवकर प्रसन्न होतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो अशी भावना आहे.

पवनपुत्र हनुमानाला शेंदूर का प्रिय आहे याची एक पौराणिक कथा सांगितली जाते. तिचा संबंध थेट रामायणाशी आहे. हनुमान राम भक्त म्हणून ओळखला जातो. रामाला प्रसन्न करण्याची एकही संधी तो सोडत नाही. सीतेला लंकेतून रावणाच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी राम लक्ष्मण त्यांच्या वानरसेनेसह गेले आणि रावणाला ठार करून अयोध्येला परतले, तेव्हा हनुमान सुद्धा अयोध्येला आले.

अयोध्येत हनुमान रोज सीतामाईच्या कपाळावर सिंदूर पाहत असत. एके दिवशी त्यांनी सीतामाईला सिंदूर का लावता असे विचारले तेव्हा तिने सिंदूर रामाला फार प्रिय असल्याचे सांगितले. तेव्हा हनुमानाने विचार केला रामाला प्रसन्न ठेवण्यासाठी आपण फक्त कपाळावर शेंदूर लावण्याऐवजी सर्व अंगभर लावला तर राम लवकर प्रसन्न होतील. दरबारात अंगभर शेंदूर फासून हनुमान आले. हे पाहून बाकीच्या दरबारी लोकांनी त्यांची टर उडवली. पण जेव्हा रामाला त्यामागचे कारण कळले तेव्हा त्यांनी हनुमानाला गळामिठी घातली. राम प्रसन्न झाले. पण तेव्हापासून हनुमानाला शेंदूर लावला जाऊ लागला. रामाला प्रिय असलेला शेंदूर हनुमानाला लावला तर हनुमान लवकर प्रसन्न होतात अशी भावना भाविकांच्या मध्ये आहे.