एकटेच हँडशेक करत असलेले बायडेन पुन्हा चर्चेत

अमेरीकेचे अध्यक्ष जो बायडेन पुन्हा एकदा सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडीओ वरून अनेकांनी बायडेन यांची टर उडविली आहे. गुरुवारी उत्तर कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात बायडेन भाषण देत होते. भाषण संपल्यावर ते एकटेच हवेत हँडशेक करताना दिसले. यावेळी त्यांच्या बरोबर मंचावर कुणीच नव्हते. त्यामुळे एकटेच हँडशेक करत असल्याचा बायडेन यांचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला.

मंचावर आपल्याशिवाय दुसरे कुणी नाही याची आठवण बायडेन यांना राहिली नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाषण संपताच ते उजवीकडे वळले आणि ‘गॉड ब्लेस यु ऑल’ असे म्हणून त्यांनी हँडशेक केला. अचानक ते प्रेक्षकांकडे वळले. विरोधकांनी बायडेन यांच्यावर टीकेची झोड उठविली आणि त्यांच्या वाढत्या वयावर निशाणा साधला.

भाषणात सुद्धा बायडेन यांनी ते या विद्यापीठात प्रोफेसर होते पण कुठल्याच वर्गाला शिकवत नव्हते असेही सांगितले. आजकाल बायडेन खूपच हरविल्यासारखे वर्तन करत आहेत आणि त्या संदर्भात सौदीच्या स्टुडीओ २२ ने एका व्हिडीओ मध्ये बायडेन यांची खूपच मस्करी केली आहे. विसराळू आणि क्षणात कुठेही बोलता बोलता झोपी जाणारे असे चित्रण यात केले गेले आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सौदी बरोबर अमेरिकेच्या संबंधात तणाव आला आहे. रशिया युक्रेन युद्धात तेल मिळण्यासाठी बायडेन यांनी सौदी क्राऊन प्रिन्सना फोन केला पण प्रिन्स यांनी फोन उचलला नाही अश्या बातम्या यापूर्वी आल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर व्हर्च्युअली चर्चा करताना सुद्धा बायडेन मध्येच जवळजवळ झोपले होते असे दिसले आहे. बायडेन नोव्हेंबर मध्ये ८० वर्षाचे होत आहेत आणि त्यामुळे विसराळू बनले आहेत अशी टीका होते आहे.