निम्म्या जगाला त्रास देतेय डोकेदुखी
डोकेदुखी झाली नाही असा जिवंत माणूस पृथ्वीतलावर सापडणे अशक्य आहे. आपण डोकेदुखीची तक्रार अनेक्नांकडून नेहमी ऐकतो आणि कधी कधी आपण सुद्धा डोकेदुखीची शिकार होत असतो. पण हा त्रास सोसणारे जगात किती लोक आहेत हे ऐकले तर आपल्याला धक्का बसेल. नवीन संशोधनात असे दिसून आले आहे कि जगातील ५२ टक्के लोक दरवर्षी डोकेदुखीची शिकार होत असतात. विशेष म्हणजे त्यातही डोकेदुखीचा त्रास सोसणाऱ्यात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक संख्येने आहेत.
जर्नल ऑफ हेडेक अँड पेन मध्ये नॉर्वेच्या सायन्स अँड टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटी मधील संशोधकांचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जगात २० ते ६५ वयोगटात डोकेदुखीचे प्रमाण जास्त आहे. १९६१ ते २०२० या काळात वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टवर आधारित हे संशोधन आहे. त्यात डोके दुखण्याच्या कारणांचे अध्ययन केले गेले आहे. त्यानुसार २६ टक्के लोकांचे डोके तणावामुळे दुखते. त्यातील ४.६ टक्के लोकांचे डोके दर महिन्यात १५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त वेळा दुखते.
१५.८ टक्के लोकांना डोकेदुखी कधीही सुरु होते आणि त्यातील ५० टक्के लोक मायग्रेनची तक्रार करतात. डोकेदुखी ही सर्वसामान्य समस्या असली तरी प्रत्येकावर तिचा विविध स्वरुपात प्रभाव पडतो त्यामुळे डोकेदुखीवर चांगले उपाय शोधले जायला हवेत. ८.६ टक्के पुरुषांना मायग्रेनचा त्रास होतो तर महिलांच्या मध्ये हे प्रमाण १७ टक्के आहे. महिन्यात १५ दिवसांपेक्षा जास्त डोके दुखी असणाऱ्यात महिलांचे प्रमाण ६ टक्के तर पुरुषांचे २.९ टक्के आहे.