या गावात हनुमानाची होत नाही पूजा

महाराष्ट्रात मशिदीवरील लाउडस्पीकर काढले गेले नाहीत तर मशिदीसमोर जोरजोरात हनुमान चालीसा वाजविण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेली धमकी आणि त्यावरून चाललेले राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात शनिवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. देशात हनुमान मंदिरांची संख्या लाखोंच्या घरात असून या सर्व ठिकाणी हे पर्व दरवर्षी साजरे होते. देवभूमी उत्तराखंड येथेही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र येथील एका गावातील नागरिक बजरंगबळीवर नाराज असून या गावात हनुमान पूजा होत नाही. इतकेच काय पण या गावात बाहेरून सुद्धा कुणी हनुमानाचा फोटो आणू शकत नाही.

चमोली जिल्ह्यातील या गावाचे नाव आहे द्रोणगिरी. याच गावात प्रसिद्ध द्रोणागिरी पर्वत आहे. रामायण काळात जेव्हा रावणपुत्र मेघनाद याने लक्ष्मणावर टाकलेल्या नागपाशामुळे लक्ष्मण मूर्च्छित झाले, तेव्हा सुषेण नावाच्या वैद्यांनी संजीवनी बुटी आणायला सांगितली. ही बुटी हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर आहे असे समजल्यावर हनुमान तेथे गेले. तेथे एका महिलेने त्यांना संजीवनी बुटी असलेला द्रोणागिरीचा भाग दाखविला, जायचा रस्ता सांगितला पण हनुमानाने मात्र द्रोणागिरीचा तेवढा तुकडा तोडून लंकेत नेला अशी कथा आहे.

तेव्हापासून या गावाचे नागरिक हनुमानावर नाराज आहेत. बजरंगबळीचे नाव घेणाऱ्याना, त्यांची पूजा करणाऱ्याना येथे समाजबाह्य केले जाते. पण श्रीराम मात्र येथे पूजनीय आहेत. त्यांची पूजा भक्तीभावाने केली जाते. द्रोणागिरीची पूजाही केली जाते. पण गावात शेंदूर, लाल पताका यांचा वापर होत नाही.श्रीलंकेत श्रीपद नावाची एक जागा असलेला डोंगर आहे तोच हा द्रोणागिरीचा हनुमानाने तोडलेला तुकडा असल्याचे सांगतात. श्रीलंकेत याला राहूमाशाला कांडा असे म्हणतात.