एलोन मस्क यांची ट्वीटर खरेदीसाठी ४३ अब्ज डॉलर्सची ऑफर

टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्वीटर या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मला आपलेसे करून घेण्याचा जणू चंग बांधला असून ट्वीटर खरेदी करण्यासाठी ४३ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली आहे. प्रतीशेअर ५४.२० डॉलर्स दराने रोख रक्कम मोजण्याची तयारी त्यांनी दाखविली असल्याचे सांगितले जात असून ट्वीटर तर्फे मस्क यांच्या कडून आलेल्या ऑफरच्या वृत्ताला दुजोरा दिला गेला आहे.

ट्वीटर मध्ये ९.२ टक्के हिस्सा खरेदी केल्यामुळे मस्क सध्या ट्वीटरचे सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर बनले आहेत. ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी मस्क यांना कंपनीच्या संचालक मंडळात सामील होण्याची ऑफर दिली होती पण मस्क यांनी ती नाकारली. मस्क यांच्या या घोषणेनंतर ट्वीटरचे शेअर ३.१० टक्क्यांनी तेजीत आले. मस्क यांनी फायलिंग मध्ये ट्वीटर मध्ये गुंतवणूक करण्याचे कारण दिले असून ते म्हणतात,’ जगभरात मुक्त भाषणासाठी मंच बनविला पाहिजे यावर माझा विश्वास आहे. चांगल्या आणि निकोप लोकशाही साठी अभिव्यक्ती स्वातंत्र आवश्यक आहे.’

ट्वीटर मध्ये गुंतवणूक करून मोठा हिस्सा खरेदी केल्यावर मस्क यांचे विचार आणि मते ट्वीटर सध्या ज्या स्वरुपात आहेत ते पाहता  मान्य करेल असे वाटत नाही आणि त्यामुळे ट्वीटर खासगी मालकीचे असणेच आवश्यक असल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे.