इन्फोसिस मध्ये या वर्षी ५० हजार फ्रेशर्सची भरती होणार

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्याची घोडदौड सुरूच राहिली असून करोना काळातून बाहेर पडल्यावर २०२२-२३ मध्ये या क्षेत्रात नोकऱ्यांची बहार येणार असे दिसत आहे. या क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस मध्ये या वर्षात किमान ५० हजार फ्रेशर्सची भरती केली जाणार असल्याचे कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी बुधवारी जाहीर केले आहे.

पारेख म्हणाले हे वर्ष आमच्यासाठी महत्वाचे आहे. निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी आवश्यक पावले आम्ही उचलत आहोत. त्यानुसार २०२२-२३ या वर्षात ५० हजाराहून अधिक फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे. २०२१-२२ मध्ये ८५ हजार फ्रेशर्स भरती केली होती पण जानेवारी मार्च या तिमाहीत अनेकांनी कंपनी सोडली. २७.७ टक्के कर्मचार्यांनी या काळात नोकरी सोडली. यंदा पगार वाढ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मे मध्ये एप्रिलच्या वाढलेल्या पगारासह पेमेंट दिले जाणार आहे असे ते म्हणाले. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला १२ टक्के निव्वळ नफा झाला असून हा आकडा ५६८६ कोटी इतका आहे. या काळात कंपनीचा महसूल २३ टक्के वाढून तो ३२,२७६ कोटींवर गेला आहे.

या क्षेत्रातील अग्रणी टीसीएसने सुद्धा यंदा पगारवाढीची घोषणा केली असून कंपनी ६ ते ८ टक्के पगार वाढ देणार आहे असे जाहीर केले गेले आहे.