एप्रिलमध्ये आकाशात भरतेय नयनरम्य संमेलन
एप्रिलच्या १७ ते २० या तारखांदरम्यान आकाशात एक नयनरम्य संमेलन भरणार आहे. आणि २३ तारखेला त्यात चार चांद लागणार आहेत. विशेष म्हणजे या संम्मेलनात कुणी अध्यक्ष नाही, कुणाचे मानपान होणार नाहीत तरीही आकाशनिरीक्षणाची आवड असलेल्या तमाम लोकांच्या डोळ्यांना मस्त मेजवानी मिळणार आहे.
या काळात गुरु, शनी, मंगळ आणि शुक्र असे चार प्रमुख ग्रह एका रेषेत दिसणार आहेत. रात्री तारे निरीक्षण पाहणाऱ्या उत्तर गोलार्धातील लोकांना ही अनोखी मेजवानी मिळणार आहे आणि विशेष म्हणजे आकाश निरभ्र असेल तर भारतात हे दर्शन अगदी स्पष्ट होणार आहे. १७ तारखेस पहाटे हे चारी ग्रह एका रेषेत दिसतील. २० एप्रिल रोजी हे दृश्य अधिक स्पष्ट आणि सुंदर दिसेल आणि २३ एप्रिल रोजी यात चंद्राचाही प्रवेश होणार आहे.
सर्वात खाली म्हणजे क्षितिजाजवळ गुरु ग्रह दिसेल, त्याच्यावर शनी, मंगळ आणि शुक्र दिसतील. २००५ मध्ये या पूर्वी तीन ग्रह एका रेषेत दिसले होते पण चार ग्रह एका रेषेत दिसणे थोडे दुर्लभ मानले जाते. जून मध्ये सात ग्रह एका रेषेत येणार आहेत पण त्यावेळी आकाश ढगाळ असेल तर हे दृश्य दिसणार नाही. २४ जून रोजी बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून आणि युरेनस ग्रह एका रेषेत येणार आहेत पण नेपच्यून आणि युरेनस फार लांब अंतरावर असल्याचे ते पाहण्यासाठी चांगली दुर्बीण लागेल असे सांगितले गेले आहे.