इम्रान खानच्या गळ्याच्या फास बनणार १८ कोटींचा हिरे हार
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या इम्रान खान यांची सत्ता संपुष्टात आल्यावर आता त्यांच्या काळात झालेला भ्रष्टाचार उघड होऊ लागला आहे. पाकिस्तानची बलाढ्य फेडरल इंव्हेस्टीगेशन एजन्सी , एफआयए, १८ कोटींना विकल्या गेलेल्या हिरे हाराचा तपास करत असून हा हिरे हार इम्रान खान यांच्या गळ्याचा फास बनेल असे संकेत मिळू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार इमरान खान सौदी भेटीवर गेले होते तेव्हा तेथून परत येताना शाही परिवाराची आठवण म्हणून खाडी देशातील सत्ताधाऱ्याने त्यांना हा डायमंड नेकलेस गिफ्ट दिला होता. नियमानुसार हा हार सरकारी खजिन्यात जमा करणे आवश्यक होते पण इम्रान पत्नी बुशारा यांच्या मनात हा हार भरल्याने इमरान यांनी तो खजिन्यात जमा केला नाही. बुशारा यांनी हा हार घालण्यापेक्षा तो विकण्यास प्राधान्य दिले आणि इमरान खान यांचे विश्वासू जुल्फी बुखारी यांनी लाहोर मधील प्रसिद्ध ज्वेलरला हा हार १८ कोटींना विकला आणि रक्कम बुशारा बेगम यांना दिली. ही बातमी बाहेर आल्यावर इमरान सरकार पडण्यापूर्वीच तपास यंत्रणा कामाला लागल्या. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मधून हा हार विक्री झाल्याचे शोधले आणि हार संबंधित ज्वेलर कडून जप्त करून सरकारी खजिन्यात जमा करून घेतला असे समजते.
याविरुद्ध बुशारा आणि बुखारी यांच्या विरोधात केस दाखल केली जात आहे पण त्याची प्रत्यक्ष झळ इम्रान खान यानाही लागणार आहे. बुशरा बेगम यांची खास मैत्रीण दागदागिने घेऊन अगोदरच दुबई मार्गे अमेरिकेत पोहोचली आहे. गेल्या वर्षी सौदी राजाने असेच भेट म्हणून दिलेले झुमके आणि कोट्यावधी किमतीचे घड्याळ सुद्धा इमरान खान यांनी याच पद्धतीने विकून त्यातून पैसे मिळविले होते असे समजते.