साऱ्या जगाचे पोट भरण्यास भारत सज्ज – पंतप्रधान मोदी

आज जगासमोर अनेक समस्या आहेत आणि जगाचे अन्न भांडार रिकामे होऊ लागले आहे. अमेरिकन अध्यक्ष जॉ बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा भारत सर्व जगाचे पोट भरण्यास सक्षम आणि सज्ज आहे, फक्त त्यासाठी जागतिक व्यापार संघटनेने परवानगी द्यावी असे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांना दिले आहे. मंगळवारी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून गुजराथच्या अन्नपूर्णा धाम ट्रस्टच्या विद्यार्थीगृह आणि शिक्षण परीसराचे उद्घाटन करताना मोदी बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

मोदी म्हणाले युक्रेन युद्ध सुरु असल्याने जगात अनेक ठिकाणी खाद्य संकट निर्माण झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी चर्चेत हा मुद्दा मांडला तेव्हा जगाला भारतीय खाद्य सामग्री उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितल्याचे मोदी म्हणाले. आज सर्व जग अनिश्चिततेचा सामना करत आहे. जे हवे ते मिळत नाही. पेट्रोल तेल खरेदी अवघड झाली आहे. सर्व दरवाजे बंद झाले आहेत आणि बहुतेक सर्व देश आपापला साठा सुरक्षित ठेवण्य्स प्राधान्य देत आहेत. पण जागतिक व्यापार संघटनेने परवानगी दिली तर उद्यापासून भारत खाद्य पुरवठा करण्यास तयार आहे.

मोदी म्हणाले आमच्या देशवासियांसाठी पुरेसे अन्न आहे आणि आमचे शेतकरी जगाला अन्न खाऊ घालण्याची व्यवस्था करण्यास सक्षम आहेत. जगाच्या कायदे नियमानुसार काम करावे लागते. त्यामुळे जागतिक व्यापार संघटना परवानगी देईल तर आम्ही जगाचे पोट भरण्यास तयार आहोत. व्यापार संघटना कधी परवानगी देईल याची मात्र मला माहिती नाही.