ईद नंतर पाकिस्तानला परतणार नवाझ शरीफ

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर पाकिस्तान मुस्लीम लीगचे अध्यक्ष शहाबाज नवाझ यांनी त्यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मायदेशी परत आणण्यासाठी पावले उचलली आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती येताच त्यांनी सर्वप्रथम नवाज यांना डिप्लोमॅटीक पासपोर्ट जारी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. शाहबाज यांचा हा निर्णय मोठा मानला जात आहे. पाकिस्तानी मिडीया नुसार ईद साजरी झाल्यावर नवाज शरीफ पाकिस्तान मध्ये परत येतील.

राजकीय जाणकारांच्या मतानुसार शहाबाज पंतप्रधान असले तरी ते फक्त पंतप्रधानपदाची खुर्ची सांभाळतील आणि प्रत्यक्ष कारभार नवाज शरीफ यांच्या हाती असेल. पाकिस्तान मुस्लीम लीगचे अनेक नेते नवाज पाकिस्तान मध्ये परतणार आहेत असा दावा पूर्वीपासून करत होते. लाहोर हायकोर्टच्या आदेशानुसार पाकिस्तान मध्ये परत आल्यावर नवाझ यांना तुरुंगात पाठविले जाऊ शकते. नवाज यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक केसेस दाखल असून २०१९ मध्ये न्यायालयाच्या परवानगीने ते ब्रिटन मध्ये उपचारासाठी गेले होते.

अल अजीजीया मिल्स भ्रष्टाचार केस मध्ये लाहोर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र त्यापूर्वी ते तुरुंगात होते. प्रकृती बिघडल्याने त्यांनी जामीन मिळवून उपचारासाठी ब्रिटनला जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतर ते पाकिस्तान मध्ये परतलेले नाहीत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नवाज यांना शांततेत जगूच दिले नाही असे सांगितले जाते. आता मात्र नवाज यांचे बंधू शहाबाज भावाला मायदेशी परत आणण्यास उत्सुक आहेत.