करोना पार्टी- बोरिस जॉन्सन यांनी भरला दंड, मागितली माफी

ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी स्वतःच करोना संदर्भात केलेले नियम तोडणे, त्याबद्दल दंड भरणे आणि माफी मागणे असा नवा विक्रम केला असून असा विक्रम करणारे ते पहिले ब्रिटीश पंतप्रधान ठरले आहेत.

गेल्या वर्षी १९ जून रोजी देशभरात कोविड प्रोटोकॉल लागू झाले असताना पंतप्रधान बोरिस यांनी मात्र त्यांच्या जवळच्या ५० परीचित लोकांसमवेत पार्टी केली होती. या पार्टीचे फोटो व्हायरल झाल्यावर विरोधकांनी बोरिस यांच्यावर सडकून टीका केली होती. सर्व देशवासीय लॉकडाऊन मुळे आणि करोना नियमावली नुसार घरात बंद असताना पंतप्रधान मात्र बिअरपार्टी करत असल्याच्या घटनेवर टीकेची झोड उठली होती.

या नंतर मंगळवारी बकिंघम येथे पत्रकार परिषदेत बोलताना बोरिस यांनी करोना नियम तोडल्याबद्दल झालेला दंड भरला असल्याचे आणि चुकीबद्दल माफी मागत असल्याचे जाहीर केले. करोना नियमावलीचा भंग केल्याबद्दल मेट्रोपोलेटन पोलिसांनी बोरिस, त्यांच्या पत्नी आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांना फिक्स पेनल्टी नोटीस दिली जाणार असल्याची सूचना देऊन तशी नोटिस बजावली होती. मात्र यात किती रकमेचा दंड ठोठावला गेला याची माहिती मिळालेली नाही.

बोरिस यांना दंड केला गेल्यावर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र बोरिस यांनी ती फेटाळून लावली. ते म्हणाले,’ मला जनादेश आहे. देशापुढच्या समस्या सोडविण्यास मी सक्षम आहे. देशवासियांनी पुढे जावे, समाजासाठी काम करावे अशी माझी इच्छा असून मी तेच काम करतो आहे.’ बोरिस यांच्या पत्नीनेही दंडाची रक्कम जमा केल्याचे सांगितले जात आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी या केस मध्ये ५० हून अधिक लोकांना दंडाची नोटीस पाठविली होती.