भारतात या लोकांकडून होते सर्वाधिक सोने खरेदी

यंदाच्या चालू वर्षात भारतात सोने आयात वाढल्याचे रिपोर्टवरून दिसून आले आहेच मात्र एका नव्या रिपोर्टवरून भारतात सर्वाधिक सोने खरेदी कुठल्या वर्गाकडून केली जाते याचाही खुलासा झाला आहे. इंडिया गोल्ड पॉलीसी सेंटरच्या सोने व सोने बाजार २०२२ च्या सोमवारी सादर केल्या गेलेल्या अहवालानुसार भारतात सोने फिजिकल फॉर्म मध्ये खरेदी करणाऱ्या नागरिकात मध्यमवर्ग आघाडीवर आहे.

या अहवालात असे नमूद केले गेले आहे, कि उच्चवर्गीय डिजिटल किंवा पेपर फॉर्मेट मध्ये सोने साठवण करण्यास प्राधान्य देतात. प्रतिव्यक्ती सोने खरेदी करण्यात श्रीमंत जास्त आहेत पण एकुणात विचार केला तर २ ते १० लाख वार्षिक उत्पन्न असलेले मध्यमवर्गीय अधिक प्रमाणात सोने खरेदी करतात आणि हे प्रमाण ५६ टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पोस्ट, भविष्य निर्वाह निधी या सुरक्षित गुंतवणुकीचा दर्जा सोने गुंतवणुकीला या गटाकडून दिला जातो. सोने गुंतवणुकीमध्ये जोखीम कमी असणे हे आणखी एक कारण.

१० लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले नागरिक शेअर्स, स्टॉक, रिअल इस्टेट अश्या क्षेत्रात बचतीस प्राधान्य देतात. एका सर्व्हेक्षणातून असे दिसून आले कि गेल्या पाच वर्षात किमान ७४ टक्के सोने खरेदी मध्यमवर्गीय नागरिकांकडून झाली असून त्यात ६५ ते ७० टक्के खरेदी विवाह आणि सण समारंभ या कारणांनी झाली आहे. ४३ टक्के कुटुंबांनी लग्नासाठी सोने खरेदी केली आहे. हे सर्व्हेक्षण ४० हजार कुटुंबात केले गेल्याचे समजते.