कोट्याधीश बेकहमची अब्जाधीश सून – निकोला पेल्टझ  

जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू आणि श्रीमंत खेळाडूंच्या यादीत वरच्या नंबरवर असलेल्या डेव्हिड बेकहम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया यांचा मुलगा ब्रुकलीन यांचा विवाह नुकताच पार पडला असून बेकहमची ही सून अब्जाधीश आहे. निकोल पेल्टझ असे तिचे नाव असून या विवाहाची चर्चा सोशल मिडीयावर जोरात होत आहे. अनेकांना कोण ही निकोल असाही प्रश्न पडला आहे.

ज्यांनी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रान्सफॉर्मर एज ऑफ एक्सटिंक्शन’ आणि ट्रान्सफॉर्मर – द लास्ट नाईट हे चित्रपट पाहिले आहेत त्यांना निकोला परिचित आहे. निकोला हॉलीवूड अभिनेत्री, मॉडेल आणि अब्जाधीश बापाची अब्जाधीश मुलगी आहे. तिच्या लग्नात २६.५६ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. शनिवारी फ्लोरिडा येथील पाम बीच वर झालेल्या रिसेप्शनला तमाम सेलेब्रिटी उपस्थित होते. त्यात हॉलीवूड तारे होते तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर होते. वेडिंग व्हेन्यू, वेडिंग ड्रेस, डेकोरेशन, सहा सेकंदाचा किस या सर्वाचीच जोरदार चर्चा होत असून हा विवाह निकोलाचे वडील नेल्सन यांच्या अलिशान हवेली मध्ये पार पडला.

२०२० पासूनचा ब्रुकलीन आणि निकोल प्रेमात पडले असून २०२० मध्येच त्यांचा साखरपुडा झाला होता. ब्रुकलीन केवळ २३ वर्षाचा आहे तर निकोल २७ वर्षांची आहे. निकोलचे वडील नेल्सन बिझिनेसमन आहेत आणि त्यांना ७ अपत्ये आहेत. ते अनेक नामवंत कंपन्यांचे चेअरमन आणि अनेक कंपन्याच्या संचालक मंडळावर आहेत. निकोलचा भाऊ ब्रॅड प्रसिद्ध हॉकीपटू आहे तर दुसरा भाऊ अभिनेता आहे. निकोल ज्या घरात राहते त्या घराची किंमत २०२० मध्येच १०१७ कोटी होती असे सांगतात.