बीएमडब्ल्यू भारतात या वर्षात आणणार २४ नवी वाहने

बीएमडब्ल्यू इंडियाने नवीन वर्षात म्हणजे २०२२ साठी एक जबरदस्त योजना आखली असून या वर्षात कंपनी भारतीय बाजारात १९ नवी कार मॉडेल्स आणि ५ नव्या बाइक्स सादर करणार आहे. ही जर्मन ऑटो कंपनी भारतात पहिल्या लाँचची सुरवात इलेक्ट्रिक आय ४ सेदानने करणार आहे. मे महिन्यात ही कार भारतात सादर होईल असे समजते.

भारतात कंपनी चालू वर्षात धमाकेदार कामगिरी बजावणार असल्याचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. पहिल्या तिमाहीत सेमीकंडक्टरची कमतरता, चीन मध्ये कोविड उद्रेक मुळे लागलेले लॉकडाऊन, युक्रेन युद्ध अश्या अनेक आव्हानांना तोंड देऊन सुद्धा भारतात कंपनीच्या कार विक्रीत २५ टक्के वाढ नोंदविली गेली आहे तर दुचाकी विक्रीतील वाढ ४१ टक्के आहे. यावर्षी कंपनी नवी २४ वाहने सादर करण्याच्या तयारीत आहे.

बीएमडब्ल्यू भारतचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले जानेवारी ते मार्च ही तिमाही कंपनीला भारतात फार चांगली ठरली. या काळात कार विक्री मध्ये २५.३ टक्के वाढ होऊन २८१५ युनिट विकली गेली. सेदान एसयुव्हीची २६३६ युनिट तर मिनी लग्झरी कॉम्पॅक्ट कार्सची १७९ युनिट विकली गेली. दुचाकीची १५१८ युनिट विकली गेली. सध्या वाहनांचा पुरवठा मर्यादित होत आहे मात्र तरी कंपनीकडे मोठ्या संखेने ऑर्डर्स आहेत. या ऑर्डर्स पूर्ण करता आल्या तर चालू वर्ष कंपनीसाठी फार लाभाचे ठरणार आहे.