ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदाचा सुनक देणार राजीनामा?

भारतवंशी ब्रिटीश अर्थमंत्री ऋषी सुनक, पत्नी अक्षताच्या नागरिकत्वावरून होत असलेल्या विवादाने त्रस्त  झाले असून याच आठवड्यात ते ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे वृत्त द संडे टाईम्सने दिले आहे. या पूर्वीच अक्षता ब्रिटीश नागरिक नसल्याचे ब्रिटन बाहेरील कमाईवर त्या कर भरत नसल्याचा खुलासा केला गेला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी या वादावर पडदा टाकण्यासाठी अक्षता यांनी त्या कुठेही कमाई करत असल्या तरी ब्रिटन मध्ये कर भरायला तयार आहेत असे सांगितले होते. वास्तविक कायदेशीर बाबींचा विचार केला तर अक्षता यांना ब्रिटन बाहेरील कमाईवर कर देण्याची आवश्यकता नाही असे मत कायदेतज्ञ व्यक्त करत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते ऋषी सुनक यांचे राजकीय भवितव्य फार उज्ज्वल आहे. यदा कदाचित पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी राजीनामा दिला तर सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात. टीकाकारांच्या मते मात्र वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण बनले असतानाच सुनक यांनी कर्मचारी आणि श्रमिक यांच्यावर जादा कर लावला आहे. अश्यावेळी अक्षता मात्र प्रचंड कमाई असूनही कर भरत नाहीत. विशेष म्हणजे सुनक डाऊनिंग स्ट्रीटवर ज्या घरात राहतात, ते निवासस्थान त्यांनी शनिवारी रिकामे केले आहे. घरातील सामान वेस्ट लंडन मधील त्यांच्या नव्या आलिशान घरात हलविले गेल्याचे समजते.

सुनक यांच्या जवळच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार डाऊनिंग स्ट्रीटवर घर सोडण्याचा निर्णय सुनक यांनी पूर्वीच घेतला होता. त्यांच्या मुलीची शाळा नवीन घरापासून अगदी जवळ असल्याने त्यांनी घर बदलले आहे.