चीनी टिकटॉकने वाढविली युट्यूबची चिंता
भारतात बंदी घातल्या गेलेल्या चीनी टिकटॉक शॉर्ट व्हिडीओ अॅपने जगभरात कल्लोळ उडवून दिल्याचे दिसून आले आहे. एकीकडे फेसबुक, ट्वीटर सारख्या लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्मच्या महसुलात घट होताना दिसत आहे मात्र तेथेच टिकटॉकची रोजची कमाई नवनवी रेकॉर्ड नोंदवीत आहे. जागतिक स्तरावर जाहिराती मिळविण्यात टिकटॉकने फेसबुक, स्नॅपचॅट ला कधीच मागे टाकले आहे आणि टयूट्यूबची चिंता वाढविली आहे.
द गार्डियनच्या रिपोर्ट नुसार वर्ष २०२४ पर्यंत टिकटॉकचा जाहिरातीतून मिळणारा महसूल गुगलच्या युट्युबचे २३.६ अब्ज डॉलर्सचे आकडे मागे टाकेल. सध्या टिकटॉकने स्नॅपचॅटला मागे टाकले आहेच. विशेष म्हणजे ही कामगिरी टिकटॉकने अश्या वेळी केली आहे जेव्हा भारतात टिकटॉकसह अनेक चीनी अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. वास्तविक टिकटॉकचा चीन नंतर भारतात दुसरा मोठा मार्केट शेअर होता. जून २०२० मध्ये अनेक चीनी अॅप्स वर सुरक्षेच्या कारणास्तव भारताने बंदी घातली होती.
यावर्षी टिकटॉकचा जागतिक महसूल ११.६ अब्ज डॉलर्सच्या तिप्पट झाला असून जगभरात टिकटॉक अनेकांची पहिली पसंती आहे. गतवर्षात युजर्सने सरासरी दर महिना १९.६ तास टिकटॉकवर घालविले आहेत. फेसबुकचे मंथली अॅक्टीव्ह युजर्स २.९ अब्ज आहेत तर इन्स्टाग्रामचे २ अब्ज आहेत. पण तरीही टिकटॉकने मार्क झुकेरबर्ग आणि गुगलची चिंता वाढविली आहे. युएस मध्ये गेल्या काही काळात टिकटॉक युजर्सची संख्या प्रचंड वाढली आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत नॉन गेमिंग अॅप मध्ये टिकटॉक टॉपवर आहे.