कीवच्या रस्त्यावर अचानक दिसले बोरिस जोन्सन आणि झेलेन्स्की
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन अचानक युक्रेनला पोहोचले आहेत. राजधानी कीवच्या रस्त्यातून बोरिस आणि झेलेन्स्की फिरत असल्याचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओ मध्ये दोन्ही नेते स्नायपर्स आणि अन्य सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून फिरताना दिसत असून रस्त्यात भेटणाऱ्या नागरिकांना अभिवादन करत आहेत.
यात रशियन हल्ले झेलत असलेल्या युक्रेनच्या सिटी सेंटर जवळून जाणारा एक नागरिक ब्रिटीश पंतप्रधानांना आपल्या राजधानीत पाहून भावनावश होऊन , तुमची आम्हाला गरज आहे’ असे सांगताना दिसत आहे. तर बोरिस यांनी या नागरिकाला’ तुम्हाला भेटून चांगले वाटले. तुमची मदत करण्यात आम्हाला आनंद आहे. तुमच्याकडे झेलेन्स्की यांच्या रुपात एक चांगला आणि खंबीर राष्ट्रपती आहे’ असे सांगताना दिसत आहेत.
२४ फेब्रुवारी पासून रशियाने हल्ले सुरु केल्यानंतर जी सेव्हन देशांचा पहिलाच राष्ट्राध्यक्ष पहिल्या युक्रेन यात्रेवर आला आहे. अमेरिका, कॅनडा आणि अन्य अनेक देशांनी रशियाची या हल्ल्यांवरून निंदा केली असून रशियावर दबाब आणण्यासाठी अनेक प्रतिबंध लागू केले आहेत. ब्रिटीश पंतप्रधान जोन्सन यांनी युक्रेनला १२० चिलखती वाहने आणि अँटी शिप मिसाईल देण्याचा वादा केला आहे.