कमी होत नाही भारतीयांचे सोने वेड
करोना काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांचे जीव करोनाने घेतले आणि अजून देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली नाही असे दिसत असले तरी भारतीयांचे सोने वेड कणभर सुद्धा कमी झालेले नाही. आकडेवारी सांगते त्यानुसार गतवर्षी पेक्षा २०२१-२२ मध्ये सोने आयातीत ३३.३४ टक्के वाढ झाली असून ही आयात ४६.१४ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. याचा परिणाम देशाच्या करंट अकौंट डेफिसिटवर होण्याची शंका अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. अधिकृत आकडेवारी नुसार २०२०-२१ मध्ये आयात ३४.६२ अब्ज डॉलर्स होती आणि २०२१-२२ मध्ये त्यात वाढ होऊन व्यापारी घाटा १९२.४० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
चीन नंतर भारत सोने आयातीत जगात दोन नंबरवर आहे. भारतातील सोने आयात प्रामुख्याने दागिने मागणी पूर्ण करण्यासाठी होते. २०२१-२२ मध्ये देशाची दागिने निर्यात ५० टक्के वाढली असून ३९ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. रिझर्व बँकेने ऑक्टोबर डिसेंबर या तिमाहीत डेफिसिट म्हणजे व्यापार घाटा वाढून २३ अब्ज डॉलर्सवर गेल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ मध्ये देशात ८४२.२८ सोने आयात केले गेले आहे. याच काळात पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने, दागिने, रसायन क्षेत्राने चांगली कामगिरी बजावली असून २०२१-२२ मध्ये निर्यातीने ४१८ अब्ज डॉलर्सचे रेकॉर्ड नोंदविले आहे.