आर अश्विन बनला पहिला आयपीएल ‘’रिटायर्ड आउट’ खेळाडू
देशात सध्या वाढत्या उन्हाळ्याबरोबरच आयपीएलचा धडाका सुरु आहे. क्रिकेट मध्ये रिटायर्ड हर्ट आणि रिटायर्ड आउट असे दोन वेगळे नियम आहेत. त्यात आयपीएल मध्ये रवीचंद्रन अश्विन याने रिटायर्ड आउट होणारा पहिला फलंदाज होण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात अश्विनची नोंद पहिला रिटायर्ड आउट खेळाडू अशी झाली आहे.
रिटायर्ड हर्ट नियमात फलंदाज संघाला गरज असेल तर परत मैदानात उतरून फलंदाजी करू शकतो मात्र रिटायर्ड आउट मध्ये फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. राजस्थान रॉयल्स कडून खेळताना आयपीएल २०२२ च्या विसाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध फलंदाजी करत असताना अचानक अश्विन क्रीझ सोडून पॅव्हेलीयन कडे परतला आणि त्याच्या या निर्णयाची कुणालाच कल्पना नव्हती.
या सामन्यात राजस्थानने १० व्या ओव्हर मध्ये सहाव्या नंबरवर अश्विनला फलंदाजी साठी पाठविले होते. या पूर्वी रियान पराग या नंबरवर येत असे. डावाच्या १९ व्या ओव्हरचे दोन चेंडू झाल्यावर अश्विन अचानक पॅव्हेलियन कडे परतला आणि त्याने रियान परागला संधी दिली. अश्विनने २३ चेंडूवर २८ रन्स काढल्या तर परागने चार चेंडूमध्ये आठ धावा घेतल्या. राजस्थानने प्रथम फलंदाजी घेताना ६ विकेट मध्ये १६५ धावा काढल्या होत्या. हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला.