या पाच राज्यांना केंद्राने जारी केला कोविड अॅलर्ट
चीन अमेरिकेमध्ये कोविडच्या वाढत चाललेल्या प्रमाणाची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील पाच राज्यांना सतर्क राहण्याची चेतावणी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाना, केरळ, महाराष्ट्र आणि मिजोरम सरकारांना त्या संदर्भात पत्रे पाठविली असल्याचे समजते. या पत्रात कोविड संदर्भात सतर्कता वाढवा, टेस्टिंग वाढवा आणि गरज असेल तर पुन्हा कोविड नियमावली जारी करा अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
या राज्यात गेल्या काही दिवसात करोना संक्रमण दर वाढत चालल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. त्यामुळे याबाबत सुरवातीपासुनच दक्षता घेणे गरजेचे बनले आहे. या राज्यात नव्या केसेसचे प्रमाण दररोज वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची गंभीरपणे समीक्षा करावी आणि नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करावीत असे आदेश दिले गेले आहेत. देशाच्या अन्य राज्यात नवीन रुग्ण संख्या लक्षणीय रित्या कमी होते आहे पण या पाच राज्यात गेल्या ७ दिवसात पॉझीटीव्ह रेट मध्ये अचानक वाढ दिसून आली आहे.
गेल्या २४ तासात केरळ मध्ये ३५३, महाराष्ट्रात ११३, हरियाना मध्ये ३३६, मिझोरम मध्ये १२३ नवे रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासात ११०९ नवे रुग्ण मिळाले असून ४३ मृत्यू नोंदविले गेले आहेत. नवीन व्हेरीयंट सक्रीय असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून केली गेल्यावर भारतात १८ वर्षांवरील सर्वाना १० एप्रिल पासून प्रीकॉशन डोस घेण्यास मंजुरी दिली गेली आहे. आरोग्य कर्मचारी आणि ६० वरील व्यक्तींना हा डोस मोफत मिळणार आहे तर बाकी नागरिकांना त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. दुसरा डोस घेऊन ९ महिने झाल्यानंतर हा तिसरा डोस घेता येणार आहे.