भारताच्या पहाडी भागातील वाहतूक होणार अधांतरी
भारताच्या पर्वतीय पहाडी भागात भविष्यातील वाहतूकीसाठी नवीन व्यवस्था योजली गेली आहे. भविष्यात या भागातील वाहतूक अधांतरी म्हणजे रोपवे मधून होणार असून त्यासाठी पर्वतमाला योजना केंद्राने कार्यान्वित केली आहे. या भागात रस्ते किंवा रेल्वे रूळ टाकण्यासाठी येणारा खर्च मोठा आहे, काम पूर्ण होण्यास वेळ अधिक लागतो आणि अनेकदा नैसर्गिक परिस्थितीमुळे रस्ते बांधणे शक्य होत नाही. शिवाय पर्यवरण नुकसान होते. त्यामुळे या सर्व भागात रोप वे सिस्टीम उभारल्या जात आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली गेली आहे.
रोपवेचे अनेक फायदे आहेत. हा आधुनिक, पर्यावरण पूरक आणि कायमचा पर्याय आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे आणि प्रवाशांना सुविधा मिळत आहेत. संपूर्ण पहाडी भाग रोपवेने जोडणे हे आव्हान आहे. या योजनेत उत्तराखंड, हिमाचल, मणिपूर, जम्मू काश्मीर व अन्य पूर्वोत्तर राज्याचा समावेश केला गेला आहे. अनेक राज्यात वेगाने काम सुरु झाले आहे. देशात प्रथमच अशी योजना कार्यान्वित केली गेली आहे.
यामुळे रस्ते बांधणीचा खर्च कमी होणार आहे, वेळ वाचणार आहे. सीमावर्ती भागातील राज्ये मजबूत होणार आहेत आणि देशाच्या सुरक्षेसाठी ते गरजेचे आहे. रोपवे साठी फारसे भूमीअधिग्रहण करावे लागत नाही. आवाजरहित आणि कमी वेळात प्रवास होतो.पर्यावरणाला कमी नुकसान होते.. गिरनार येथे सुरु झालेल्या रोपवे मुळे २.३किमी चे अंतर अवघ्या ७ मिनिटात कापले जाते. गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्र नदीवरचा रोपवे सर्वात मोठा नदीवरचा रोप वे असून २४ ऑगस्ट २०२० पासून तो सुरु झाला आहे.
भविष्यात उत्तराखंड येथे ७, केदारनाथ हेमकुंड, हिमाचल, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्कीम, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर मध्ये रोप वे बांधले जाणार आहेत.