ब्रिटनच्या राणीपेक्षा श्रीमंत असूनही अक्षता सुनक म्हणून भरत नाहीत कर

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता सध्या करचुकवेगिरी वरून चर्चेत आले असले तर त्यात अक्षता यांच्याकडून कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नसल्याचे सांगितले जात आहे. अक्षता ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ पेक्षा श्रीमंत आहेत पण तरीही त्या ब्रिटन मध्ये कर भरत नाहीत असे आरोप केले जात आहेत. मात्र मुळातच अक्षता ब्रिटनमध्ये राहत असल्या तरी त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व आहे. ब्रिटनमध्ये राहण्यासाठी दर वर्षी भरावा लागणारा ३० हजार पौंड कर त्या नियमाने भरतात असे समजते.

ही चर्चा सुरु होण्यामागे कारण आहे युक्रेन रशिया युद्ध. अर्थमंत्री सुनक यांनी रशियावर ब्रिटीश सरकारने लावलेल्या प्रतिबंधानुसार सर्व ब्रिटीश कंपन्यांनी रशियातील गुंतवणूक काढावी असे आदेश जारी केले आहेत. मात्र अक्षिता सुनक इन्फोसिसच्या भागीदार आहेत आणि त्यांची कंपनी रशियात व्यवसाय करते आहे यावरून सुनक यांना टार्गेट केले जात आहे. अक्षता इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. त्यांनी २०१० मध्ये स्वतःचे फॅशन लेबल अक्षता डिझाईन सुरु केल्याचे २०११च्या वोग प्रोफाईल मध्ये म्हटले गेले आहे. त्या फॅशन डिझायनर आहेत आणि दुर्गम भागातील कलाकारांबरोबर काम करतात. २०१३ मध्ये त्यांनी सुनक यांच्याबरोबर व्हेन्चर फर्म कॅटामास सुरु केली आहे.

४२ वर्षीय अक्षता यांच्य्कडे इन्फोसिसचे १ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स आहेत आणि त्यातून त्यांना डीव्हीडंडपोटी १.१६ कोटी पौड मिळतात. सुनक यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा इन्फोसिसशी संबंध नाही. अक्षता भारतीय नागरिक आहेत आणि ब्रिटन मध्ये नॉन डोम स्टेट्स नुसार राहतात. त्यामुळे ब्रिटन बाहेर त्यांची जी कमाई आहे त्यावर कर भरण्याची गरज नाही. अक्षता यांनी कुठेही नियम मोडलेला नाही.