माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ उतरले छगन भुजबळ


पंढरपूर – 100 कोटींच्या वसूली प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ आता राज्याचे मंत्री छगन भुजबळ उतरले आहेत. छगन भुजबळ यांनी पंढरपुरात बोलताना गृहमंत्र्यांना कोण देते 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो, अशा शब्दात अनिल देशमुख यांची पाठराखण केली. भुजबळ म्हणाले की, अनिल देशमुख आणि दुसरी व्यक्ती म्हणे असे बोलले, हे तिसरा चौथ्याला सांगतो. अनिल देशमुख कोणाला बोलले, आपण लांबून ऐकले पण आपणास बोलले नसल्याचे सचिन वाझे याने चांदीवाल कमिशनला सांगितले होते. पण त्यांच्यावर काही करून मोठ्या रकमांचे आरोप ठेवायचे, मग ईडीची केस करायची आणि जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवायचा हा सर्व ईडीचा प्रकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

न्यायालयाचाही यामुळे नाईलाज होतो, असे सांगताना पैसे गेले कुठे ? कोणी वसूल केले? काही सापडले का तुम्हाला? असा सवालही भुजबळ यांनी केला. असे सांगोपांगीवर केस उभी राहते आणि त्यानंतर अटक होते. हे आपण यापूर्वी 50 वर्षात कधी पहिले नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

महाविकास आघाडीची साथ राजू शेट्टी यांनी सोडल्याच्या संदर्भात विचारले असता भुजबळ म्हणाले की, जरी आघाडीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली असली, तरी याचा कोणताही परिणाम कोल्हापूर निवडणुकीवर होणार नाही. कोल्हापुरात तीनही पक्ष मजबुतीने काम करीत असून शिवसेनेतील मतभेद देखील दूर झाल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच या कटामागेच ‘मास्टर माईंड’ असल्याचे ईडीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. देशमुखांच्या जामीन अर्जाला विरोध करत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. देशमुखांच्या जामीन अर्जावर आज न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. देशमुखांची सुटका झाल्यास साक्षीपुराव्यांशी छेडछाड करु शकतात, असे ईडीनं म्हटले आहे. देशमुखांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून कुटुंबियांच्या नावे संपत्ती खरेदी केल्याचा आरोपही ईडीने केला आहे.