अमेरिकेने प्रतिबंध घातलेल्या पुतीन यांच्या कन्या हे उद्योग करतात

युक्रेनच्या बुचा येथे युद्ध दरम्यान रशियाने केलेला नरसंहार उघड झाल्यावर अमेरिकेने रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या मारिया आणि कॅटरीना या दोन मुलींवर आर्थिक प्रतिबद्ध लावले आहेत. वडिलांच्या संपत्तीवर या दोन मुलींचा कंट्रोल असू शकेल या संशयावरून हे प्रतिबंध लावले गेल्याचे सांगितले जाते.

पुतीन यांच्या या कन्या करतात काय, राहतात कुठे या संबंधी फारच थोडी माहिती आहे. पुतीन यांनी त्यांच्या परिवाराला नेहमीच मिडियापासून दूर ठेवले आहे. या दोघी पुतीन यांची पहिली पत्नी लुडमिला यांच्यापासून झालेल्या असून पुतीन आणि लुडमिला यांनी २०१३ मध्ये घटस्फोट घेतला आहे. पुतीन आत्तापर्यत फक्त दोन वेळा मुलींबद्दल बोलले आहेत पण त्यावेळी त्यांनी मुलींची नावे घेतली नव्हतीच. २०१५ मध्ये एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुतीन यांनी’ तिने फक्त रशियन विद्यापीठातूनच शिक्षण पूर्ण केले आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो’ असा उल्लेख केला होता. पुतीन यांची ही मुलगी मारिया असून तिने सेंट पीटर स्टेट विद्यापीठातून जीवशास्त्र मध्ये पदवी आणि मास्को मेडिकल स्कूल मधून डॉक्टर पदवी घेतली आहे.

मारिया पोटाच्या विकारांची तज्ञ आहे आणि डच उद्योगपती जोरीट फासेन बरोबर विवाह करून ती नेदरलंड मध्ये राहते. एका मुलाखतीत तिने मेडिकल फार्मसीची मालक असल्याचे सांगितले होते. छोटी कॅटरीना मास्को विद्यापीठात काम करते आणि ‘रॉक एन रोल’ डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे. रॉयटर्स नुसार २०१५ मध्ये तिने ‘वर्ल्ड रॉक एन रोल’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता.