युक्रेनसाठी मोदींनी सुरक्षा हमीदार बनावे- झेलेन्स्की
रशिया युक्रेंन युद्ध सुरु झाल्यास आता ४३ दिवस लोटले असताना युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भारतीय न्यूज चॅनलला दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. यात झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनसाठी सुरक्षा गॅरंटर बनावे अशी मागणी केली आहे. झेलेन्स्की यावेळी रशिया आणि भारत यांच्या संबंधांविषयी बोलताना म्हणतात, भारताचे सोविएत युनियनबरोबर संबंध होते, रशिया बरोबर नाही. मोदींनी युक्रेनसाठी सुरक्षा हमीदार बनावे आणि युक्रेन रशिया करारात रशियाकडून कराराचे उल्लंघन केले गेले तर रशियाचा विरुद्ध उभे राहावे. भारताला युक्रेन आणि रशिया दोघांच्या संबंधात संतुलन ठेवणे अवघड आहे.
झेलेन्स्की पुढे म्हणतात, संयुक्त राष्टांकडून आमची पूर्ण निराशा झाली आहे. ते नुसते बोलतात आणि नुसती चिंता दाखवितात. रशियाविरुद्ध घातले गेलेले अर्धे निर्बंध निरुपयोगी आहेत. प्रतिबंध घालताना ते अण्वस्त्रा सारखे, अत्याधुनिक हत्यारांप्रमाणे तेज हवेत, नुसता देखावा नको. युक्रेनचे समर्थन करताना रशियाबरोबरचे आर्थिक संबंध सुरूच ठेवले जात आहेत. दुसरा पक्ष कमजोर असेल तर शक्तीशाली पक्ष कोणत्याही बळाचा वापर करण्यास धजावतो. त्यामुळे या युद्धात अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो.
जगाला खरोखर या युद्धाचा अंत व्हावा असे वाटत असेल तर आम्हाला प्रचंड शस्त्रे पुरवली गेली पाहिजेत. आम्हाला रशियाचा कोणताही भाग जिंकायचा नाही पण आमचीच जमीन परत मिळवायची आहे. आम्ही माघार घेणार नाही. आमच्या ज्या ज्या शहरांवर रशियाने कब्जा केला आहे ती आम्हाला परत मिळवायची आहेत.