मुंबईत शिवसेनेचे आज ‘शक्तीप्रदर्शन’; संजय राऊतांच्या स्वागतासाठी ढोल-ताशा पथकांसह शिवसैनिक सज्ज


मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कारवायांचा सपाटा लावला आहे. ईडीच्या रडारवर महाविकास आघाडीचे अनेक नेते आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. केंद्रीय यंत्रणांचा केंद्रात सत्तेत असलेले भाजप वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. यामध्ये प्रामुख्याने संजय राऊत यांचे नाव एक आघाडीवर होते.

ईडीने दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत गुरुवारी, म्हणजेच आज दिल्लीहून मुंबईत येणार आहेत. शिवसेनेकडून यावेळी संजय राऊतांचं जंगी स्वागत केले जाणार आहे, तसेच शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. संजय राऊत यांचे स्वागत मुंबई विमानतळापासून ते त्यांच्या भांडुपमधील घरापर्यंत केले जाणार आहे.

संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून ईडीवर आरोपांची तोफ डागली होती. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्यांना फैलावर घेतले होते. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, संजय राऊतांनी भाजप नेत्यांसोबतच थेट ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा घणाघाती आरोप केला होता.

शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांच्या आगमनाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्यासाठी 40 बसेस, ढोल-ताशा पथक अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार आणि काही मंत्रीही विमानतळावर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.