सोमय्यांची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांवर संतापले संजय राऊत


नवी दिल्ली – आयएनस विक्रांतमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी किरीट सोमय्यांची पाठराखण केल्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. जर ईडी भाजपची बटीक नसेल, तर याप्रकरणी कारवाई करावी, असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच हा मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संजय राऊत बोलत होते. आज राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

आयएनएस विक्रांतच्या संदर्भात देशभावना, लोकभावना यांच्याशी खेळ करुन, बलिदानाचा आणि मातृभूमीचा लिलाव करुन बाजार मांडणारे भाजपचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील सोमय्या यांच्या राष्ट्रद्रोही भ्रष्टाचाराचे प्रकरण मी बाहेर काढले. एवढे होऊनही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आश्चर्य वाटते. राष्ट्रभक्तीवर गाणी गातात, भाषणे देतात. दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व शिकवतात…पण ज्या पद्धतीने काल राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची वकिली करण्याचा प्रयत्न केला, ते पाहून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, हेगडेवार आणि आजचे मोहन भागवत यांचा जीव तीळतीळ तुटला असेल. अटलजी वैगेरे तर सोडून द्या, अशी टीका संजय राऊतांनी केली.

तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा माणूस ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी होऊ शकली, त्याचा लिलाव मांडला. त्याच्यातून काही कोटी रुपये त्यांनी आणि त्यांच्या मुलाने गोळा गेले, घोटाळा केला. याचे पुरावे समोर आले तरी पुरावे कुठे आहेत म्हणता?, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

ते काल म्हणाले की आम्हाला नखे कापून शहीद होण्याची सवय आहे. तुम्ही काय उपटले ते सांगा. या देशासाठी तुमचे काय योगदान आहे. उलट ज्यांचे बलिदान आहे, त्या बलिदानाचा लिलाव करुन पैसे गोळा करत आहात. कधी राम मंदिराच्या नावे, कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले आहेत. महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान असून त्यातून पैसे गोळा केला आणि त्या भयंकर अशा भ्रष्ट गुन्हेगाराची बाजून घेऊन त्याची वकिली करता, अशी टीका संजय राऊतांनी केली.

ते पुढे बोलताना म्हणाले की, अभ्यासाशिवाय, पुराव्याशिवाय मी बोलत नाही म्हणता. मग काय पुरावा आहे तुमच्याकडे? राजभवन तुमचेच असून त्यांनीच पुरावा दिला आहे. शिवसेनेतर्फे आज राज्यसभा आणि लोकसभेत स्थगन प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती यावेळी संजय राऊतांनी दिली.

महाराष्ट्रात आज उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशद्रोही लोकांना तुरुंगात टाकू. देशभक्तीचे, हिंदुत्वाचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवण्याचे जे उद्योग चालवल आहेत, ते गळून पडले आहोत. मी भविष्यात अजून काही विषय मांडणार आहे, असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला. जरी या लोकांनी आयएनस विक्रांत भंगारात घालवली असली, तरी त्या अरबी समुद्रात विक्रांतच्या नावे भ्रष्टाचार करणारे हे फालतू पुढारी आणि त्यांचे पक्ष बुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असेही ते म्हणाले.

पाठीमागून आमच्यावर कितीही वार केले, खंजीर खुपसला, तरी शिवसेनेचे मनोबल खचलेले नाही. जिथे भाजपचे भ्रष्ट्राचारी जातील, तिथे जोडे मारल्याशिवाय लोक राहणार नाहीत. महाराष्ट्र सर्व काही खपवून घेईल, पण देशाचे रक्षण करणे हा महाराष्ट्राचा पीडिजात धंदा, वारसा आहे. देशाच्या संरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात कोणी गद्दार असेल, तर त्याला याच मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नसल्याचेही ते म्हणाले,

भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरातून पैसे गोळा करण्यात आले असून हा आकडा मोठा असू शकतो. फक्त राज्यातील हा आकडा आहे. सोमय्यांनी हे पैसे निवडणुकीत वापरले आहेत. पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे चलनात आणले आणि नील सोमय्याच्या व्यवसायात वापरण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

पैसे गोळा करण्यासाठी ७११ मोठे बॉक्स वापरण्यात आले. हे बॉक्स मुंलुंडच्या कार्यालयात ठेवण्यात आले. काही बॉक्स फोडण्यात आले. त्या पैशांची बंडले बांधण्यासाठी कार्यकर्ते बोलवण्यात आले. ते पैसे पीएमसी बँकेतून वळवण्यात आले. सोमय्यांच्या बिल्डर मित्राच्या कार्यालयात काही बॉक्स हे ठेवण्यात आले. हा मनी लाँड्रिंगचा प्रकार होऊ शकतो. पीएमएलए कायदा लागू शकतो. ईडी नावाची संस्था भाजपची बटीक नसेल, तर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.