मुंबई – गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर भारतीय तेल कंपन्यांनी जारी केले आहेत. आज सर्वसामान्यांना सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आज कोणतीही वाढ केलेली नसल्यामुळे आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल
पेट्रोल-डिझेलचे दर देशात 22 मार्चनंतर आजपर्यंत 14 वेळा वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर, 2021 नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले होते. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.
दरवाढ न झाल्यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा स्थानिक करामुळे दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9-12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या अपडेट करतात.