पुतीन यांच्या मुलींवर अमेरीकेचे प्रतिबंध

अमेरिकेने युक्रेन युद्धासाठी अपराधी ठरविलेल्या रशियावर उलट कारवाई करताना बुधवारी रशियन बँकाना अधिक दंड केला आहे तर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या दोन मुलींनाही निशाणा बनविले आहे. पुतीन यांच्या मारिया आणि कॅटरीना या दोन्ही मुलींवर अमेरिकेने प्रतिबंध लावले आहेत.

या संदर्भात अमेरिकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार स्बरबँक व अल्फा बँक यांच्यासाठी अमेरिकेच्या आर्थिक प्रणालीत बदल केले गेले आहेत. यामुळे आता अमेरिकन नागरिक या बँकांशी व्यापारिक संबंध ठेऊ शकणार नाहीत. तसेच पुतीन कन्या मारिया आणि कॅटरीना तीखोनोवा, पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन, परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव यांची पत्नी आणि मुले, सुरक्षा परिषदेचे सदस्य, माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव आणि पुतीन यांच्या संपूर्ण परिवाराला आर्थिक प्रणालीतून दूर केले गेले आहे.

पुतीन यांच्या परिवाराची अमेरिकेतील संपत्ती शोधून काढली जाणार आहे. याचवेळी युक्रेनला जास्त शस्त्रे पुरविली जाणार आहेत. रशियन सैनिक युक्रेनी महिलांवर बलात्कार करत आहेत, निरपराध नागरिकांच्या हत्या करत आहेत आणि नागरिकांना यातना देत असल्याचे आरोप युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी सुरवाती पासून केले आहेत. युक्रेनमधील महत्वाची शहरे रशियन सेनेने नष्ट केली आहेत आणि तेथे भूसुरुंग पेरले आहेत. कीव शहरात अनेक प्रेते रस्त्यात पडली असल्याचे वृत्त यापूर्वीच आले आहे.