दुनियेतील अजब नोकरीसाठी तुम्हीही करू शकता अर्ज

काही तरी हटके करायची इच्छा असलेल्या किंवा साहसप्रेमी लोकांसाठी एक अजब नोकरी उपलब्ध झाली असून जगभरातील कुणीही नागरिक त्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. ही नोकरी पृथ्वीच्या सर्वात निर्जन स्थानी आहे. येथे टपाल आणि पेंग्विन मोजणी अशी कामे करावी लागणार आहेत. कोविड साथीनंतर प्रथमच या जागा ओपन केल्या गेल्या आहेत. ऐकायला हे काम सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते खडतर आहे. साहसप्रेमींसाठी मात्र ही नोकरी पर्वणी ठरेल असे सांगितले जात आहे.

कल्पना करा जेथे तुम्हाला नोकरी साठी जायचे आहे तेथे मैलोगणती बर्फाशिवाय दुसरे काही नाही. ब्रिटीश चॅरिटी संस्थेने त्यांच्या सर्वात दूरच्या पोस्ट ऑफिस, संग्रहालय आणि गिफ्ट शॉप साठी व्हेकन्सी काढल्या आहेत. त्यासाठी उमेदवाराला अंटार्कटिक मधील पोर्ट लॉकरॉय बेस पोस्ट ऑफिस मध्ये रुजू व्हावे लागणार आहे. या साठी संस्था कर्मचारी टीम नियुक्त करत असल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.

या नोकरीसाठी दरवर्षी शेकड्याने अर्ज येतात. गेल्या वेळचे पोस्टमास्टर विक्की इंगलीस यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. आयुष्यात ही संधी एकदाच मिळू शकते असे सांगताना त्यांनी नोकरीवर हजर होताना प्रथम बर्फ फोडून रस्ता करावा लागला अशी आठवण सांगितली आहे. येथे फ्लश टॉयलेट नाही.

या अवघड जागी पोस्ट कशाला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याचे उत्तर असे की ही पहिली अंटार्कटिक द्वीपावर स्थापन झालेली ब्रिटीश वसाहत आहे. १९४४ ते १९६२ पर्यंत ही वसाहत होती पण २००६ मध्ये ब्रिटीश चॅरीटी ट्रस्टने तिचे अधिग्रहण केले. आता हे संरक्षण आणि पर्यटन स्थळ बनले असून नोव्हेंबर ते मार्च या काळात येथे शेकडो पर्यटक येतात. हे पर्यटक पोस्टाचा उपयोग करतात. येथे एक संग्रहालय आणि गिफ्ट शॉप सुद्धा आहे. २०२२-२३ च्या सिझन साठी येथे नवीन कर्मचारी भरती केली जाणार असून त्यासाठी संस्थेच्या वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहेत. बेस लीडर, शॉप मॅनेजर आणि जनरल असिस्टंट अशी ही पदे आहेत.