करोनाचा एक्सई व्हेरीयंट वरून बीएमसी, केंद्रीय आरोग्य विभाग आमनेसामने

मुंबई मध्ये नुकताच ओमिक्रोनचे नवे व्हेरीयंट एक्सईचे संक्रमण झाल्याची पहिली केस सापडल्याचा दावा केला जात असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा दावा खोडून काढला आहे. परिणामी सध्या बीएमसी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय आमनेसामने आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बीएमसीचा दावा खोडून काढताना जीनोम सिक्वेन्सिंग मध्ये ओमिक्रोनच्या एक्सई व्हेरीयंटची पुष्टी झाली नसल्याचे म्हटले असून पुन्हा एकदा या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आयएनएसएसीओजी मध्ये हा नमुना तपासला जाईल असे सांगितले आहे. बुधवारी बीएमसीने जे २३० नमुने जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठविले गेले होते त्यातील एकात सबव्हेरीयंट एक्सई सापडल्याचे जाहीर केले होते. या ५० वर्षीय महिलेमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तिने करोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत मात्र तरी तिच्यामध्ये एक्सई संक्रमण आढळले असे बीएमसीचे म्हणणे आहे.

हा नमुना पुन्हा नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ बायो जिनोमिक्स कडे पाठविला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी ब्रिटन मध्ये सापडलेल्या ओमिक्रोन बीए.२ च्या तुलनेत नवे व्हेरीयंट १० टक्के अधिक संक्रामक असल्याचे म्हटले होते. ओमिक्रोनच्या एका भागात एक्सई म्युटेशन ट्रॅक केले जात आहे. ब्रिटनच्या आरोग्य विभागाने ओमिक्रोनची एक्सडी, एक्सई आणि एक्सआय अशी तीन सबव्हेरीयंट शोधली असून त्यावर अध्ययन सुरु आहे.