मॅराडोनाच्या ऐतिहासिक जर्सीचा लिलाव, ४० कोटींच्या बोलीची अपेक्षा
अर्जेन्टिनाचा जगप्रसिद्ध माजी फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना याने त्याच्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड नोंदविली.त्यातील सर्वात महत्वाचे १९८६ मध्ये स्वतःच्या हिमतीवर आर्जेन्टिनाला वर्ल्ड कप विजेते बनविणे हे एक आहे. या स्पर्धेच्या इंग्लंड विरुद्धच्या उपउपांत्य फेरीत मॅराडोनाने वापरलेली जर्सी आता लिलावात येत असून तिला किमान ४० लाख पौंड म्हणजे ४० कोटी रुपये बोली लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या सामन्यात विवादास्पद ठरलेल्या ‘ हँड ऑफ गॉड’ म्हटल्या गेलेल्या गोल मुळे इंग्लंडच्या हातून हा सामना निसटला होता आणि त्यानंतर आर्जेन्टिनाने अंतिम फेरीत वर्ल्ड कप जिंकला होता. या सामन्यात मॅराडोना हेडरने गोल करत असताना बॉल त्याच्या हाताला लागून गोल पोस्ट मध्ये गेला होता पण सामन्यातील रेफ्रीच्या नजरेतून ही बाब निसटली होती. त्यानंतर मॅराडोनाने मस्तक आणि हँड ऑफ गॉड यांच्या मिश्रणातून गोल झाल्याची कबुली दिली होती. सामन्यानंतर मॅराडोनाने ही जर्सी इंग्लंडच्या मिडल फिल्डर स्टीव्ह हॉज याला दिली होती आणि आता तिचा लिलाव होत आहे.
प्रसिद्ध लिलाव कंपनी सोथबे तर्फे हा लिलाव होत असून सध्या हि जर्सी मँचेस्टर मध्ये इग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संग्रहालयात आहे. सोथबेने बुधवारी या लिलावाबाबत माहिती दिली असून हा लिलाव २० एप्रिल पासून ऑनलाईन होणार आहे. ही जर्सी जगातील सर्वात महत्वपूर्ण खेळाच्या आठवणी देणाऱ्या वस्तू मध्ये सामील आहे. मेक्सिको सिटी मध्ये २६ जून १९८६ मध्ये आर्जेन्टिना आणि इंग्लंड यांच्यातील हा ऐतिहासिक ठरलेला सामना खेळला गेला होता.