मुंबई – राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या अनेक दिवसांपासून कारवायांचा सपाटा लावला आहे. ईडीच्या रडारवर महाविकास आघाडीचे अनेक नेते आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये त्यावरुन वारंवार जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना केंद्रात सत्ता असलेले भाजप त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता.
राज ठाकरेंनी ईडीची नोटीस मिळाल्यानंतर ट्रॅक बदलला – छगन भुजबळ
आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा तसेच राज ठाकरे यांच्यावर आरोप करत मंत्री छगन भुजबळ यांनी देखील निशाणा साधला आहे.
ईडी अटक करताच जामीन मिळणे कठीण असते, ईडीचा कायदा हा राक्षसी कायदा आहे, आधी राज्य सरकारच्या चुका दाखवा, वैयक्तिक आरोप कशासाठी? असा सवाल भुजबळांनी केला आहे. ईडीचा दुरुपयोग भाजपकडून होत असून आमच्या पुर्वजांनी घेतलेल्या प्रॉपट्याही ईडीने जोडल्या आहेत. भारतात अशी असंख्य प्रकरणे, केसेस पूर्ण झाल्याचे नाही आणि प्रॉपर्टी अटँच राहतात. भाजपविरोधात बोललात, की काहीना काही शोधून कारवाई करायची, असे ठरवून कारवाई केली जाते.
अनेक नेते यात भरडले जात आहेत, हे नाकारता येत नाही. घोटाळ्यांशी संबंध असलेले अनेक नेते भाजपच्या गेले आणि त्यांच्यावरची कारवाई थांबली. अनेक नेते भाजप विरोधात बोलायचे ते आता भाजपची प्रशंसा करायला लागले. सर्वांना ईडीचा प्रताप भोगावा लागतो, जिथे जिथे भाजप विरुद्ध राज्य, त्या राज्यांना खिळखिळे करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहे. निवडणुकीला आता 2 वर्षे राहिली, तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडणुकीत उभे राहा, मग कळेल लोक कुणाच्या बाजूने, पुन्हा राज्य मिळावे, हे सरकार पडले पाहिजे म्हणून असे जबरदस्तीने करणे योग्य आहे असं वाटत नाही.
भुजबळ म्हणाले, आम्ही कारवाई केली की जामीन मिळतो. ईडीने कारवाई केली की जामीन मिळत नाही. भाजपच्या विरोधात तुम्ही बोललात की कारवाई होते, तुम्ही विरुद्ध बोलणार नाही तोपर्यंत काही कारवाई होणार नाही, जे विरुद्ध बोलत नाही, त्यांनी काही काळजी करण्याचे कारण नाही.