या तारखेला रिलीज होणार ‘शेर शिवराज’चा ट्रेलर, तुम्हालाही मिळू शकते सहभागी होण्याची संधी


गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे सातत्याने चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ‘शेर शिवराज’ असे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेलर लाँच सोहळ्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील चौथा चित्रपट शेर शिवराज हा चित्रपट येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर कोणत्या तारखेला लाँच होणार याबाबतची घोषणा दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे. त्यासोबतच त्यांनी एका अनोख्या स्पर्धेचेही आयोजन केले आहे.


‘शेर शिवराज’ ट्रेलरची वाट पाहत होता ना, आता थेट ट्रेलर लॉन्च इव्हेंटला येण्याचीच तयारी करा! #SherShivrajContest मध्ये सहभागी होण्यासाठी ही पोस्ट नीट वाचा. तुमच्या एंट्रीजची आम्ही वाट पाहतोय, अशी पोस्ट दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केली आहे. त्यासोबतच त्यांनी एका पोस्टमध्ये ही स्पर्धा नेमकी कशी असेल? यात सहभाग नोंदवण्यासाठी प्रेक्षकांना काय करावे लागेल? याबाबत सर्व माहिती त्यांनी दिली आहे.

शेर शिवराज या ट्रेलर लाँच सोहळ्यात सहभागी होण्याची जवळपास ५० हून अधिक भाग्यवंतांना सुवर्णसंधी मिळणार आहे, असेही त्यांनी यात नमूद केले आहे. त्यासोबतच दिग्पाल लांजेकर यांनी येत्या ११ एप्रिल २०२२ ला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होईल, अशीही माहिती या पोस्टद्वारे दिली आहे.