दहावी-बारावी परीक्षेचा निकाल औरंगाबाद विभागामुळे उशिरा लागण्याची शक्यता


औरंगाबाद : दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल औरंगाबाद विभागीय मंडळामुळे उशिरा लागणार असल्याचे औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्रामुळे कळत आहे. आता सर्वच प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना कारवाई करणार असल्याचे पत्र औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी पाठवले आहे. हे काम प्राचार्य, मुख्याध्यापकांनी शिक्षकांडून मुदतीत करुन घेतले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा बोर्डाने दिला आहे.

राज्य महामंडळाच्या अध्यक्षांकडून 5 एप्रिल रोजी ऑनलाईन मीटिंमध्ये दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेण्यात आला. औरंगाबाद विभाग वगळता उर्वरित सर्वच मंडळांचे उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज वेळापत्रकानुसार 90 टक्के झाल्याचे या आढाव्यात समोर आले आहे. ही बाब औरंगाबाद मंडळाच्या दृष्टीने खेदाची असल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहावीचा निकाल 10 जूनपूर्वी आणि बारावीचा 15 जूनपूर्वी लागणे अपेक्षित आहे. पण औरंगाबाद विभाग मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज विचारात घेता, निकाल उशिरा लागण्याची भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांचे शिक्षक संबंधित शाळांचे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला विलंब करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित शाळेचे मंडळ मान्यता काढून घेण्यात येईल आणि बोर्डाचा सांकेतिक क्रमांकही गोठवण्यात येईल, असाही इशारा बोर्डाने दिला आहे.

या प्रकरणात संबंधित शाळांच्या प्राचर्य, मुख्याध्यापकांनी वैयक्तिक लक्ष देऊन राज्य मंडळाला दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत घोषित करता येईल, असा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने जाणीवपूर्व प्रयत्न करावा, असे आवाहन औरंगाबाद विभागीय मंडळाचे प्र. विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी केले आहे.