नितीन गडकरी यांची The Kashmir Files चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. बराच वाद या चित्रपटामुळे झाला आहे. हा चित्रपट पाहण्याचे आवाहन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. आता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी या चित्रपटावर त्यांचे मत मांडले आहे.

नुकतीच इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नितीय गडकरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक करत ते म्हणाले, द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणला आहे. त्यामुळेच हा चित्रपट लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील.

नितीन गडकरी यांच्यासोबत या कार्यक्रमात ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा द्वारे द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांचा सन्मान करण्यात आला. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.