मुंबई : सध्याच्या घडीला राज्यात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमनेसामने आलेले चित्र पाहायला मिळत आहे. मनसेने मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वादानंतर आता मुंबईतील दादर परिसरातील शिवसेना भवन तसेच शिवाजी पार्क परिसरात पोस्टर लावले आहेत. मनसेने या पोस्टरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून मजकूर लिहिला आहे. यामध्ये राज ठाकरेच बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवत असल्याचे म्हटलं आहे.
शिवसेना भवन तसेच शिवाजी पार्क परिसरात मनसेची पोस्टरबाजी; बाळासाहेब आपला वारसा खऱ्या अर्थाने चालवत आहेत राज ठाकरे
माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालताहेत. यासाठी हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राज ठाकरे चालवत आहेत… जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या.
दरम्यान, सुरक्षारक्षकांनी शिवसेना भवनाच्या मनसेने लावलेले पोस्टर हटवले आहेत. शिवाजी पार्कवरील 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदींवर एवढ्या मोठ्या आवाजात भोंगे का लावतात? मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार.
दरम्यान भाजपने राज ठाकरे याच्या या मागणीचा समर्थन केले आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, अशा मागण्या हा भाजपच्या अजेंड्याचा भाग आहे. भाजप शेजारच्या कर्नाटक आणि इतर राज्यांमध्येही हा मुद्दा उपस्थित करत आहे. लोकांमध्ये बेचैनी निर्माण करुन हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारच्या मागण्या केल्या जातात.