मुंबईत सीएनजी सात आणि पीएनजी गॅस पाच रुपयांनी महागला


मुंबई : सीएनजी आणि पीएनजीच्या वाढीव दरांमुळे मुंबईत भडका उडाला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईतील सीएनजी आणि पीएनजी महागले आहे. आज सकाळपासून शहरात सीएनजीच्या दरात सात रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. गॅसच्या दरांमध्ये महानगर गॅस लिमिटेडने मोठी वाढ केली आहे. नव्या दरानुसार मुंबईत सीएनजी 67 रुपये प्रति किलो आणि पाईप्ड कुकिंग गॅस 41 रुपये प्रति किलो झाला आहे. वॅट राज्य सरकारने कमी केला होता. त्यामुळे सीएनजीचे दर कमी होते. पण आता महानगर गॅस लिमिटेडने दर वाढवल्यामुळे सामान्य मुंबईकरांना मिळालेला काहीसा दिलासाही आता नाहीसा झाला आहे.

यासंदर्भात महानगर गॅस लिमिडेटने काढलेल्या निवेदनात नमूद असे केले आहे की, ग्राहक-केंद्रित कंपनी असल्यामुळे आम्ही 8 लाखांहून अधिक सीएनजी आणि 18 लाखांहून अधिक पीएनजी ग्राहकांसाठी किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यामुळे आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.

सीएनजीवरील वॅट राज्य सरकारने 13.5 टक्क्यांनी कमी केला होता. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी वॅट कमी करण्याची घोषणा केल्यानंतर त्यानंतर अधिसूचनाही जारी झाली होती. 1 एप्रिलपासून बदललेले नवीन दर लागू झाले होते. यामुळे महाराष्ट्रात सीएनजी प्रतिकिलो सहा रुपये आणि पीएनजी प्रति किलो साडेतीन रुपये स्वस्त झाला होता.

परंतु सामान्य मुंबईकरांना वॅट कमी केल्याचा फायदा फार दिवस मिळाला नाही. हा दिलासा मिळून पाच दिवस होत नाहीत, तोपर्यंत सीएनजी प्रति किलो सात रुपये आणि पीएनजी प्रति किलो पाच रुपयांनी महागला आहे. सामान्य नागरिकांच्या खिशाला महानगर गॅस लिमिटेडच्या या निर्णयामुळे कात्री बसत आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाल्यामुळे आज सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना सीएनजी आणि पीएनजीमधील दरवाढ पाहायला मिळेल.

आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर मुंबईसह राज्यभरात गगनाला भिडले आहेत. राज्याच्या परभणीत पेट्रोलने 122 रुपये लिटर दर पार केला आहे. आता सीएनजी आणि पीएनजीच्या वाढलेल्या दरांनी सामान्याचे जगणेच कठीण केले आहे.